- भक्ती आणि सेवेचा दिव्य संगम; महाशिवरात्री निमित्त भद्रावतीत समाजएकतेचा प्रेरणादायी संदेश
- चंद्रपुर महाराष्ट्र
- रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत
- दिनांक:- 15 फरवरी २०२६
- भद्रावती प्रतिनिधी
- सविस्तर बातमी:-महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भद्रावती नगरीत भक्ती, सेवा आणि समाजएकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर तालुका भद्रावती यांच्या वतीने येथील भद्रनाग देवस्थान परिसरात उपवास करणाऱ्या भाविकांसाठी शाबुदाणा खिचडीचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविण्यात आले.
- सकाळपासूनच मंदिर परिसरात “हर हर महादेव”च्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शिवभक्तांनी अभिषेक, पूजन व मंत्रजप करत भगवान महादेवाची आराधना केली. या पवित्र वातावरणात करण्यात आलेल्या खिचडी वाटप उपक्रमामुळे उपवासधारक भाविकांना मोठा दिलासा मिळाला. अनेकांनी या सेवाभावी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.
- या प्रसंगी चंद्रपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करत सामाजिक ऐक्य जपण्याचा संदेश दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात विश्वास आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली.
- जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. तालुका अध्यक्ष संतोष शिवणकर, उपाध्यक्ष महेश निमसठकर, सुनील दैदावार, शाम चटपल्लीवार यांनी सक्रिय सहभाग घेत सेवा कार्य पार पाडले.
- तसेच माजी नगरसेवक अफझल भाई, इम्रान खान, समाजसेवक सूरज शहा, जयंता जवादे, अल्ताफ शेख, डोंगे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. विविध समाजघटकांनी एकत्र येऊन साकारलेला हा उपक्रम भद्रावतीत समाजएकतेचा आणि सौहार्दाचा प्रभावी संदेश देणारा ठरला.
- महाशिवरात्रीचा हा सोहळा भद्रावतीत भक्ती, सेवा आणि सामाजिक सलोखा यांचा अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.
भक्ती आणि सेवेचा दिव्य संगम; महाशिवरात्री निमित्त भद्रावतीत समाजएकतेचा प्रेरणादायी संदेश
संपादक


