Wednesday, September 16, 2026
HomeBreaking newsचारगाव पुलिया बांधकाम प्रकरणी गंभीर अनियमिततेचे आरोप, तातडीच्या चौकशीची मागणी

चारगाव पुलिया बांधकाम प्रकरणी गंभीर अनियमिततेचे आरोप, तातडीच्या चौकशीची मागणी

चारगाव पुलिया बांधकाम प्रकरणी गंभीर अनियमिततेचे आरोप, तातडीच्या चौकशीची मागणी

चंद्रपूर महाराष्ट्र 

रिपोर्टर :- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज भारत

दिनांक: १३ जानेवारी २०२६

सविस्तर बातमी:-सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत चारगाव येथे सुरू असलेल्या पुलिया बांधकामाबाबत ग्रामस्थांकडून गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर येत असून, या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि निकृष्ट दर्जा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिकांच्या मते हे बांधकाम विकासाचे नसून संभाव्य भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले आहे.

पुलिया बांधकाम स्थळी कोणताही अधिकृत माहिती फलक लावण्यात आलेला नाही. वर्क ऑर्डर, मंजूर निधी, कामाचा कालावधी याबाबत कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नसल्याने कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी अभियंता किंवा तांत्रिक अधिकारी उपस्थित नसल्याचेही वारंवार निदर्शनास येत आहे.

नागरिकांनी असा आरोप केला आहे की पुलिया बांधकामात कमी दर्जाचे साहित्य वापरले जात असून तांत्रिक मोजमाप आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. आवश्यक प्रमाणात लोखंडी सळया न वापरणे, क्युरिंग प्रक्रिया न करणे आणि घाईघाईत काम उरकण्याचा प्रकार सुरू असल्याने भविष्यात ही पुलिया धोकादायक ठरू शकते.

या कामावर कार्यरत असलेल्या मजुरांचे वेतन अनेक दिवसांपासून थकित असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. काम करूनही मजुरांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने शासनाकडून आलेला निधी नेमका कुठे खर्च केला जात आहे, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

बांधकामाबाबत माहिती घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किंवा पत्रकार घटनास्थळी गेले असता, कोणताही जबाबदार अधिकारी किंवा कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित राहत नाही. प्रश्न विचारल्यास टाळाटाळ करणारी उत्तरे दिली जात असल्याने संपूर्ण प्रकरण अधिक संशयास्पद बनत आहे.

या प्रकरणात ग्रामपंचायत चारगावची जबाबदारीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सरपंच अस्मिता कवटे आणि ग्रामसेवक राजू लोणारे यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली की नाही, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणताही अहवाल सादर केला आहे की नाही, याबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की चारगाव पुलिया बांधकाम तात्काळ थांबवून स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी, कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मजुरांचे थकीत वेतन त्वरित अदा करावे. अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular