वनजमिनीवरील अवैध उत्खनन थांबवण्यासाठी धडक कारवाई, 1 जेसीबी व 3 ट्रॅक्टर जप्त — उत्कृष्ट कामगिरीबद्दल वनरक्षक महादेव मुंडे सन्मानित
चंद्रपुर महाराष्ट्र
रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत
दिनांक:- २३ नवंबर २०२५
सविस्तर बातमी:-चंद्रपुर सावली वनपरिक्षेत्रात वनजमिनीवर सुरू असलेल्या अवैध उत्खनन व वाहतूक विरोधातील मोहीम अधिक तीव्र होत असून अलीकडील कार्यवाहीत वनविभागाने मोठे यश मिळवले आहे. मौजा कढोली परिसरातील वनविभागाच्या मालकीच्या क्षेत्रात विनापरवानगी उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच वनविभागाने तत्काळ पथक रवाना करून 1 जेसीबी आणि 3 ट्रॅक्टर जप्त केले.
सदर मोहिमेत वनरक्षक महादेव मुंडे यांनी दाखवलेली तत्परता, धाडस व व्यावसायिक कौशल्य विशेष उठून दिसले. त्यांच्या सततच्या गस्त, तसेच तात्काळ प्राप्त झालेल्या माहितीवर जलद प्रतिसाद यांच्या जोरावर अवैध उत्खनन करणाऱ्या घटकांवर कारवाई शक्य झाली.
या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वनरक्षक श्री महादेव मुंडे, शिरशी यांना पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन विशेष गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक करत वनसंवर्धनासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी या प्रसंगी सांगितले की, वनरक्षक महादेव मुंडे यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती, सजगता व कर्तव्यनिष्ठा यामुळेच आज ही मोहीम यशस्वी झाली आहे आणि अशा अधिकाऱ्यांमुळे अवैध उत्खननाविरुद्धची झुंज अधिक मजबूत होणार आहे. पुढील काळात वनातील अनधिकृत उत्खनन व वाहतूक थांबवण्यासाठी कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वनविभागाच्या तडाखेबाज भूमिकेमुळे परिसरात अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.


