महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर यांचा जनसेवक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
सेवाभाव, कृतज्ञता आणि प्रेरणेचा जागर; सोहळा ठरला संस्मरणीय
चंद्रपुर महाराष्ट्र
रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत
दिनांक:-३ फरवरी २०२६
सविस्तर बातमी:-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने मूल येथील माॅ. दुर्गा माता सभागृहात आयोजित जनसेवक सन्मान सोहळा २०२६ सेवाभाव, कृतज्ञता आणि प्रेरणेच्या वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या जनसेवकांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा हा क्षण उपस्थितांसाठी भावनिक व प्रेरणादायी ठरला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक निलेश सोमानी, विदर्भ अध्यक्ष अनुपकुमार भार्गव, श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा सचिव तथा दैनिक महासागर जिल्हा प्रतिनिधी प्रवीण बलकी होते.
प्रमुख अतिथी म्हणून मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष एकताताई समर्थ, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, चंद्रपूर जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बंडू रामटेके, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे, नागपूर जिल्हाध्यक्ष शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी सत्यजित आमले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचे प्रतीक असलेला दीप उजळताच संपूर्ण सभागृहात सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रा. महेश पानसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजाला योग्य दिशा देणारी प्रभावी शक्ती आहे. जनतेसाठी झटणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळते आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडते.” त्यानंतर त्यांचा वाढदिवस केक कापून आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात मूल नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिक्षण, समाजकार्य व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याच सोहळ्यात भद्रावती तालुका अध्यक्षपदी संतोष उर्फ पवन शिवणकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटनेचा विश्वास लाभल्याने हा क्षण त्यांच्यासाठी भावूक ठरला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा संघटक रूपचंद धारणे यांनी सांगितले की, “महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून पत्रकारांच्या हक्कांसाठी, संघटन बळकट करण्यासाठी आणि समाजातील सत्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. तालुका ते जिल्हा पातळीवर संघटन मजबूत करणे हेच आमचे ध्येय आहे.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थेरे सर यांनी केले, तर राहुल थोरात यांनी आभार मानले.
या सन्मान सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यामुळे संघटनात्मक एकतेचे प्रभावी दर्शन घडले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.


