देवाडा खुर्दला पाण्यासाठी तडफड, प्रशासन झोपेत
तत्काळ काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा
चंद्रपुर महाराष्ट्र
रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत
दिनांक:- ३ फरवरी २०२६
सविस्तर बातमी:-चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्फोटक बनला असून नागरिक अक्षरशः पाण्यासाठी तडफडत आहेत. गावातील नळयोजना कोलमडल्या आहेत, हॅन्डपंप बंद पडले आहेत आणि बहुतेक विहिरी चिखल व गाळाने भरून नापीक झाल्या आहेत. मात्र तरीही प्रशासन डोळेझाक करत बसले आहे.
गेल्या अनेक वर्षांत पाणीपुरवठ्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा केला जातो, पण आज देवाडा खुर्दच्या जनतेला एक घोट स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. हा पैसा नेमका कुणाच्या घशात गेला, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
या गंभीर परिस्थितीबाबत सामाजिक कार्यकर्ता मनीष राऊत यांनी पंचायत समिती पोंभुर्णा येथे जाऊन गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली व प्रशासनाला खडेबोल सुनावले. आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम हवे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
मनीष राऊत यांच्या प्रमुख मागण्या
ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विहिरींचे तात्काळ खोलीकरण व स्वच्छता करावी
प्रत्येक प्रमुख विहिरीवर सोलर पंप व पाण्याची टाकी बसवावी
गावातील गरजेच्या ठिकाणी नवीन हॅन्डपंप उभारावेत
देवाडा खुर्दसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना तात्काळ मंजूर करावी
जर प्रशासनाने त्वरित काम सुरू केले नाही, तर देवाडा खुर्दचे नागरिक सामाजिक कार्यकर्ता मनीष राऊत यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र व उग्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.
पाणी हा मूलभूत हक्क आहे, भीक नाही. देवाडा खुर्दच्या जनतेवर अन्याय सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन कामाला सुरुवात करावी, अन्यथा संघर्ष अटळ आहे.


