तलोळी परिसरातील अवैध वाळू चोरीचा थैमान
चंद्रपुर/ महाराष्ट्र
रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत
दिनांक:-29 अक्टूबर 2025
सविस्तर बातमी :-चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तलोळी गाव परिसरात सध्या अवैध वाळू चोरीचे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. या ठिकाणी मालक पुनेकवार,शिवा आणि त्याच्यासोबत असलेले काही रेती तस्कर उघडपणे, निर्भयपणे आणि कोणत्याही सरकारी भीतीशिवाय वाळूची चोरी करत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे रेती तस्कर रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्या मोठ्या पोकलैंड, JCB, ट्रॅक्टर आणि डंपरच्या सहाय्याने नदीकिनाऱ्यावरून वाळू उचलून नेत आहेत. कोणतीही परवानगी नसताना सुरु असलेला हा काळाबाजार प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा या बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असली तरीही, आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या रेती माफियांच्या पाठिशी काही प्रभावशाली लोकांचे आश्रय असल्याने ते कोणाच्याही भीतीशिवाय धुडगूस घालत आहेत. तलोळी परिसरातील नदी परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त होत असून पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे.
या प्रकारामुळे शासनाचे लाखो रुपये महसूल बुडत आहेत आणि शासकीय महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्या निष्क्रियतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
स्थानिक जनतेने मागणी केली आहे की — जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून, अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि नदी परिसरात कायमस्वरूपी पोलीस गस्त या गंभीर विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधत आहोत.
पर्यावरण, महसूल आणि कायदा सुव्यवस्था जपण्यासाठी तात्काळ कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे.


