गोंडवाना विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग व बेस्टफिझीक्स स्पर्धा संपन्न
चंद्रपुर महाराष्ट्र
दिनांक:- १२ अक्टूबर २०२५
रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत मिडिया नेटवर्क
सविस्तर बातमी:- चंद्रपुर मूल दिनांक ९ ऑक्टोबर, गुरुवार रोजी तालुका क्रीडा संकुल, मूल येथील वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्रात गोंडवाना विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग व बेस्टफिझीक्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुलाचे प्रशिक्षक व ग्रुप ऑफ फीट लिफ्टरचे संचालक एन.आय.एस. कोच करण सुरेश कोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या स्पर्धेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील तीस ते चाळीस महाविद्यालयांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये कर्मवीर महाविद्यालय, मूल; डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम; डॉ. शांताराम पोटदुखे महाविद्यालय; सरदार पटेल महाविद्यालय; चिंतामणी महाविद्यालय, घुघूस; आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व खेळाडूंच्या वजन तपासणीने करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या संचालिका डॉ. अनिता लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती, मूलचे अध्यक्ष श्री. अखिलभाऊ गांगरेडिवार अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धर्मेंद्रभाऊ सूत्रपवार व श्री. राकेशभाऊ सातपैसे उपस्थित होते.
उद्घाटनानंतर लगेचच स्पर्धेला प्रारंभ झाला. विविध वजनी गटांमध्ये खेळाडूंनी आपापल्या उत्कृष्ट कामगिरीने पहिला क्रमांक पटकाविला. विजेत्यांना पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत तालुका क्रीडा संकुलातील प्रशिक्षित खेळाडू महिमा वाघ आणि आचल करंजेकर यांनी आपल्या वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले. हे सर्व विजेते खेळाडू आता होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन व अंमलबजावणी अत्यंत सुरळीत व शिस्तबद्धरीत्या पार पडली, याचे श्रेय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक करण कोसरे यांना जाते. तांत्रिक अधिकारी म्हणून श्री. अमोल आवडे, आकाश चौधरी, पंकज बेले, दीपक भांडारकर, विष्णूवर्धन येरमी, भूषण देशमुख, शार्विल देआरकर, आकाश भाऊ आदींनी जबाबदारी सांभाळली.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल डॉ. अनिता लोखंडे यांनी प्रशिक्षक करण कोसरे यांचे विशेष कौतुक करून त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अनिता लोखंडे मॅडम, तालुका क्रीडा अधिकारी श्री. विनोद ठीकरे, तालुका क्रीडा संयोजक श्री. नामदेव पिजुरकर, डॉ. आशिष चहारे, डॉ. विक्की पेटकर आदी मान्यवरांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


