साईबाबा वॉर्डात पोलिसांचा धाडसी छापा, सात जणांना अटक – तब्बल ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपुर महाराष्ट्र
दिनांक:- २०/०९/२०२५
रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत मिडिया नेटवर्क
सविस्तर बातमी :-बल्लारपूर शहरातील साईबाबा वॉर्ड परिसरातील एका पडक्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बल्लारपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी (१९ सप्टेंबर) रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल ५८ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी शहरात नियमित पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की साईबाबा वॉर्डातील एका पडक्या घरात जुगार अड्डा सुरू आहे. माहिती खात्रीलायक असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने छापा टाकला. छाप्यात आरोपी कटपत्याचा जुगार खेळताना गाठले गेले.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, मोबाईल हँडसेट तसेच ५२ पत्त्यांचा संच असा समावेश आहे. एकूण ५८,५९० रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला.
गिरफ्तार आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत : शंकर रामदास बहुरिया (३९), प्रमोद निळकंठ पिसुडे (४८), समीर युसुफ खान (३९), छोटू महादेव कुळमेथे (२६), साहिल संतोश भोयर (२५), सचिन मनोहर मरस्कोल्हे (३१) आणि परमितसिंग सतपालसिंग चड्डा (३९). हे सर्वजण बल्लारपूर येथीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सपोनि शब्बीर पठाण, सफौ. रणविजय ठाकुर, आनंद परचाके, पोहवा पुरुषोत्तम चिकाटे, सुनील कामटकर, संतोश पंडीत, संतोष दंडेवार, पोअं खंडेराव माने, लखन चव्हाण, मिलिंद आत्राम, शरदचंद्र कारूष, सचिन राठोड आणि मपोअं शालिनी नैताम यांनी केली.
या कारवाईनंतर बल्लारपूर शहरातील इतरही जुगार अड्ड्यांवर पोलिस कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या पावलाचे स्वागत केले आहे. आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.


