भिसी गावात सट्ट्याचा धंदा फोफावला, ठेकेदारांची नावं चर्चेत — प्रशासन मौन का?
चंद्रपुर / महाराष्ट्र
रिपोर्टर:- रमाकांत यादव रिड पब्लिक न्यूज़ भारत मिडिया नेटवर्क
दिनांक:- १७ अक्टूबर २०२५
भिसी (ता. चिमूर, जि. चंद्रपूर), दिनांक 17 ऑक्टोबर:
सविस्तर बातमी :- चिमूर तालुक्यातील भिसी गावात अवैध सट्टा व्यवसाय गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून समोर आली आहे. गावातील काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सट्टेबाजीचे अड्डे सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले. या सट्टा व्यवसायाशी ठेकेदार जगदीश आणि प्रवीण या नावांचा संबंध असल्याची चर्चा गावात होत असून नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गावातील काही युवक सट्ट्याच्या नादात अडकत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही भागांमध्ये दररोज लाखो रुपयांची देवाणघेवाण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. “गावात रोजच सट्टेबाजी चालते, काहींना वरदहस्त असल्यामुळे कोणी काही बोलत नाही,” अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अवैध सट्टा धंदा सुरू असूनही अद्याप कोणतीही मोठी कारवाई न झाल्याने नागरिकांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन सादर करण्याची तयारी केली आहे.
“जर लवकरात लवकर या अवैध सट्टा रॅकेटवर कारवाई झाली नाही, तर नागरिक जनआंदोलन छेडतील,” असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
सट्टा व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, 1887 आणि संबंधित कलमान्वये कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.


