मुकबधिर विद्यार्थ्यांवर अन्यायाची परिसीमा!
निवासी मुकबधीर विद्यालय, चंद्रपूरच्या शाळेत बनावट T.C. वाटपाचे गंभीर प्रकार उघड
चंद्रपुर महाराष्ट्र
दिनांक:- २४ मई २०२५
रिपोर्टर:- नर्सिंग बोल्लम रिड पब्लिक न्यूज़ मिडिया नेटवर्क
सविस्तर बातमी:- चंद्रपुर ,दि.२४ मे २०२५ चंद्रपूर येथील निवासी मुकबधीर विद्यालय या शाळेत गेल्या काही वर्षांपासून चालू असलेल्या अनियमितता, शिक्षणातील गोंधळ आणि कायद्याचे उल्लंघन पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे २०२४ मध्ये या शाळेतील एका दिव्यांग विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप संस्थाचालकावरच झाला असूनही, आजतागायत कोणतीही कठोर प्रशासनिक कारवाई झाली नसल्याची खंत समाजात व्यक्त होत आहे.
या घडामोडीनंतर सदर शाळा मधोमध बंद करण्यात आली, आणि त्यामुळे अनेक मुकबधीर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांना स्थानांतरण प्रमाणपत्र (T.C.) दिले जात असून, त्यावर मागील तारीख ०२/०९/२०२४ नमूद करण्यात येत आहे. सद्यस्थितीत २४/०५/२०२५ असून देखील शाळा चुकीच्या पद्धतीने ही कागदपत्रे तयार करत असल्याने दस्तावेज बनावटगिरीचा संशय वाढतो आहे.
शिक्षण संचालनालयाचे स्पष्ट नियम सांगतात की,
बंद शाळांमधील सर्व नोंदी व कागदपत्रे वास्तविक तारीखीनुसार असणे आवश्यक आहे.
मागील तारीख घालून प्रमाणपत्रे देणे कायद्याने गुन्हा आहे आणि ही कृती दस्तऐवजी बनावटगिरी (Forgery) म्हणून गणली जाते.
शासकीय अनुदान घेणाऱ्या संस्थांनी असे प्रकार करणे म्हणजे शासनाचा गैरवापर होय.
या प्रकरणावरून असे दिसून येते की, संस्थेतील व्यवस्थापन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात टाकून आपल्या स्वार्थासाठी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये मुख्य आरोपी असलेल्या संस्थाचालकावर कडक कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.
सामाजिक संस्था, पालक व स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समाज कल्याण विभागाकडे केली आहे. तसेच संस्थेची मान्यता त्वरित रद्द करून ती कोणत्यातरी विश्वसनीय संस्थेकडे सोपवण्याची मागणीही लावून धरली आहे.


